पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या सोशल मीडिया अधिकृत संकेतस्थळावरून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखावरून माजी खासदार संजय काकडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सपकाळ यांनी संबंधित शब्दप्रयोगाचे समर्थन करणे अधिक गंभीर असल्याचे सांगत, काँग्रेसने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि सुनेत्रा पवार यांची माफी मागावी, अशी मागणी काकडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
माजी खासदार संजय काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना जाहीर माफी मागण्याचे आदेश द्यावेत, असे काकडे म्हणाले. तसेच, काँग्रेसकडून कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सुनेत्रा पवार यांच्याविषयी वापरण्यात आलेली भाषा महिलांचा अपमान करणारी असून, महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक संस्कृतीला ती शोभणारी नाही, असे काकडे यांनी सांगितले. राजकीय मतभेद असले तरी एखाद्या महिला नेत्याविषयी अशा प्रकारचे शब्द वापरणे योग्य ठरत नाही. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी हा शब्दप्रयोग मागे घेण्याऐवजी त्याचे समर्थन केल्याने काँग्रेसची महिला सन्मानाबाबतची भूमिका उघड झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार मोठ्या जबाबदारीला सामोरे जात असताना त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करणे असंवेदनशील असल्याचेही काकडे म्हणाले. विरोधकांनी त्यांच्या कामावर, निर्णयांवर आणि धोरणांवर प्रश्न उपस्थित करावेत; मात्र महिलांचा अवमान करणारी भाषा स्वीकारली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही काँग्रेसबाबत ठोस भूमिका घेण्याचे आवाहन केले. आपल्या कुटुंबातील सुनेविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशा पद्धतीने बोलत असतील, तर शरद पवार यांनी काँग्रेसपासून दूर जाण्याचा विचार करावा, असेही संजय काकडे म्हणाले. काँग्रेसने माफी मागितली नाही किंवा सपकाळ यांच्यावर कारवाई केली नाही, तर शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील संबंधांचा पुनर्विचार करावा, असे आवाहन काकडे यांनी केले आहे.
काँग्रेसने संबंधित विधान मागे घेत सुनेत्रा पवार यांची माफी मागावी, यासाठी २४ तासांची मुदत देत असल्याचे काकडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. अन्यथा काँग्रेसच्या कार्यक्रमांसमोर निदर्शने करण्यात येतील आणि पक्षाच्या नेत्यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.