SANJAY KAKADE : "गुंगी गुडिया" वाद... काँग्रेसच्या वक्तव्याने राजकारण तापले, संजय काकडे आक्रमक, सपकाळांच्या राजीनाम्याची मागणी - टॉप न्यूज मराठी

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आलेल्या "गुंगी गुडिया" या उल्लेखाने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या भूमिकेचे समर्थन केल्याने वाद आणखी वाढला आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे.

संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, "या वक्तव्यातून काँग्रेसची खालच्या स्तरावरील राजकीय संस्कृती समोर आली आहे. महाराष्ट्राची जनता यांना याची जागा दाखवेल. जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही.अशा प्रकारचे घाणेरडे विधान करणाऱ्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपदी ठेवणे चुकीचे आहे. माझी राहुल गांधींना विनंती आहे की त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरून हटवावे. त्यांना जर महाराष्ट्रात राहायचे असेल तर त्यांनी आपली भाषा सांभाळली पाहिजे.जर सपकाळ यांनी माफी मागितली नाही आणि भूमिका मागे घेतली नाही, तर काँग्रेसच्या नेत्यांना काळे फासण्यासारखे प्रकारही होऊ शकतात."

या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "राजकारण हे मुद्द्यांवर व्हायला हवे. पण सध्या काही पक्षांना प्रसिद्धी मिळत नसल्याने ते अशा खालच्या पातळीवर जाऊन विधान करत आहेत. यांना कोणी विचारत नाही, म्हणून बातमीत राहण्यासाठी असे शब्द वापरले जात आहेत. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नव्हती. "बदनाम होंगे तो क्या, नाम तो होगा" अशी टिप्पणी करत काँग्रेसच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, या टीकेनंतरही हर्षवर्धन सपकाळ यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी पक्षाच्या अधिकृत ट्विटचे समर्थन केले असून, जनतेच्या प्रश्नांवर बोलणे हेच आपले काम असल्याचे सांगितले आहे. सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या एका शब्दाच्या उल्लेखावरून आता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. या वादाचे पडसाद येत्या अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे.