खाकी वर्दी कायद्याचे रक्षण करण्यासाठी असते की वाळूमाफियांच्या दावणीला बांधण्यासाठी? असा संतप्त सवाल आता विचारला जाऊ लागलाय. वैजापूर येथील एका गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेले पोलीस आणि सोबत असलेल्या वाळूमाफियांच्या टोळक्याने एका निष्पाप शिक्षकाला बेदम मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या मारहाणीत जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुरेश बोरसे यांचा मृत्यू झाला आहे.
"तुम्ही पोलीस आहात तर तुमची वर्दी कुठेय? तुमचे आयकार्ड दाखवा..." हा न्याय्य प्रश्न विचारणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी आणि माफियांच्या गुंडांनी एवढं मारलं की त्यांचा श्वास गुदमरला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वेरूळ परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करताना चक्क स्वतःच्याच पोलीस सहकाऱ्यांची नावे लपवल्याचा गंभीर आरोप आता होतोय. बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास वेरूळ येथील कौशिकी गल्लीत ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुरेश बोरसे हे आपल्या १२ वर्षांच्या भाच्यासह रात्री आयस्क्रीम आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, त्याच वेळी तिथं काळ दबा धरून बसला होता. वैजापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार वाल्मीक बणगे हे 'पोलीस' पाटी लावलेल्या एका खासगी कारमधून आणि त्यांच्यासोबत वाळूमाफिया आवारे हा आपल्या साथीदारांसह मागे '३०२' नंबर असलेल्या काळ्या रंगाच्या स्कार्पिओमधून तिथं आले होते. हे टोळकं गुंडांसारखं लोकांच्या घरात घुसून आरोपीचा शोध घेत होतं. घराजवळ गोंधळ सुरू असलेला पाहून शिक्षक सुरेश बोरसे तिथं गेले. त्यांनी "तुम्ही कोण आहात?" अशी विचारणा केली. त्यावर पोलिसांनी "आम्ही पोलीस आहोत" असं दरडावून सांगितलं. पण ना अंगावर वर्दी, ना हातात आयकार्ड, ना पोलिसांची अधिकृत गाडी! बोरसे यांनी पोलिसांना त्यांच्या वर्दीबद्दल आणि आयकार्डबद्दल विचारलं. पोलिसांना हा प्रश्न एवढा झोंबला की, "तू आम्हाला विचारणारा कोण?" असं म्हणत पोलीस आणि वाळूमाफियांच्या टोळक्याने बोरसे यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला.शिक्षकाला मारहाण करून गुंड आणि पोलीस त्यांना गाडीत टाकून पळवून नेत होते. बोरसे यांच्या १२ वर्षांच्या भाच्याने धावत जाऊन घरात ही माहिती दिली. बोरसे यांची पत्नी अनिता आणि मुलगी घराबाहेर धावल्या. मुलीने तर चालत्या गाडीला आडवं होऊन "माझ्या वडिलांना कुठे नेताय?" असा जाब विचारला. गाडीत सुरेश बोरसे श्वास घेण्यासाठी धडपडत होते, "मला वाचवा" म्हणून ओरडत होते. कुटुंबीयांनी त्यांना गाडीबाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळाच्या व्हिडिओमध्ये पीएसआय एकनाथ नागरगोजे स्पष्टपणे दिसत आहेत. वैजापूर पोलीस ठाण्याच्या डायरीतही ते तपासासाठी गेल्याची नोंद आहे. मृत शिक्षकाच्या पत्नीनेही पोलिसांचे नाव घेऊन तक्रार दिली. तरीही, खुलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करताना सात *'अज्ञात'* व्यक्तींवर गुन्हा दाखल केलाय! पोलिसांना वाचवण्यासाठीच एफआयआरमध्ये नाव टाकणं टाळलं का? असा गंभीर संशय आता उपस्थित केला जातोय.शिक्षकाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत असून ४ संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करून खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत."*
तर हा आहे खाकी वर्दीचा नवा कारनामा! गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस खासगी गाड्या घेऊन आणि तेही वाळूमाफियांच्या गुंडांना सोबत घेऊन रात्रीच्या अंधारात का फिरत होते? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कायदा हातात घेणाऱ्या या वर्दीवाल्यांवर आणि वाळूमाफियांवर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. जर रक्षणकर्तेच भक्षक बनणार असतील, तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे? या संपूर्ण प्रकरणातील दोषी पोलिसांना पाठीशी घातलं जाणार की त्यांच्यावर कठोर कारवाई होणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.