रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीचे निष्कर्ष ५ जून रोजी जाहीर होणार असल्यामुळे आज ४ जून रोजी शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली होती. गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्यामुळे शेअर बाजारात संथ आणि अस्थिर वातावरण दिसून आले. या तीव्र चढ-उतारानंतर दोन्ही मुख्य निर्देशांक अगदी किरकोळ वाढीसह सपाट पातळीवर बंद झाले.
प्रमुख निर्देशांकात मर्यादित वाढ असली, तरी व्यापक बाजारात खरेदीची भावना सकारात्मक होती. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex)१३.८४ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७४,३६०.०१ वर बंद झाला.
एनएसई निफ्टी (NSE Nifty): १०.९५ अंकांनी वधारून २३,४१६.५५ पातळीवर स्थिरावला.
आज २,१५६ शेअर्समध्ये वाढ झाली, तर १,८५२ शेअर्स घसरणीसह बंद झाले. टायटन, इटरनल, कोल इंडिया, सिप्ला आणि अदानी एंटरप्रायझेस या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, हिंदाल्को इंडस्ट्रीज, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि अल्ट्राटेक सिमेंट या शेअर्समध्ये घसरण झाली. व्याजदर कपातीबाबत किंवा अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत आरबीआयकडून मिळणारे संकेत उद्या बाजाराची पुढील दिशा ठरवतील.