Ramdas Kadam : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर शिंदे गटाचे मौन संपले, रामदास कदम म्हणाले सगळे भाजपचे लोक, मग आमचा संबंध कुठे येतो - टॉप न्यूज मराठी

राजकारण : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज एक 32 मिनिटांची ऑडिओ क्लिप समोर आणल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. या क्लिपमध्ये एक महिला आणि काही पुरुषांमध्ये संभाषण सुरू आहे. त्या महिलेच्या बोलण्यानुसार मनोज जरांगे यांना मॅनेज करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये दिल्याचा दावा केला जात आहे. या क्लिपमध्ये तीन ते चार जण कॉन्फरन्स कॉलवर बोलत असल्याचे ऐकू येते. क्लिप व्हायरल होताच सर्वत्र खळबळ उडाली आणि यावर आता शिंदे गटाकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया आली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले. त्यांनी थेट या प्रकरणातून हात झटकत सर्व खापर भाजपवर फोडले आहे.

पत्रकार परिषदेत रामदास कदम नेमके काय म्हणाले -

रामदास कदम यांनी सांगितले की मी ती 32 मिनिटांची क्लिप पूर्ण ऐकली आहे. त्यात जे तीन चार लोक बोलत आहेत ते सर्व भाजपचेच लोक आहेत. याबद्दल कोणतेही दुमत नाही. मग यात आमचा म्हणजे शिंदे गटाचा संबंध कुठे येतो. कुणाच्या सांगण्यावरून ही क्लिप केली गेली, हे पाहिले पाहिजे.

त्यांनी पुढे सवाल उपस्थित केला की ही क्लिप दोन ते अडीच वर्ष जुनी आहे. जर ही इतकी गंभीर होती तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी, लोकसभा निवडणुकीच्या वेळी का बाहेर आली नाही. आत्ताच कशी बाहेर आली. आम्ही या काळात पडद्याच्या आड होतो का. हे सगळे तपासले पाहिजे.

जरांगेंनी आरोप करण्याऐवजी आधी शिंदेंना क्लिप दाखवायला हवी होती असे मत कदम यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की या क्लिपनंतरही शिंदे आणि जरांगे यांच्या अनेक भेटी झाल्या आहेत. जर त्यांच्याकडे ही क्लिप होती तर त्यांनी थेट शिंदे साहेबांना दाखवून विचारायला हवे होते. आरोप करण्याऐवजी चर्चा करायला हवी होती.

क्लिपमधील संभाषण नेमके काय आहे -

रामदास कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार ही एक कॉन्फरन्स कॉलवरील ऑडिओ क्लिप आहे. यात छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि मुंबईचे कनेक्शन आहे. संभाषणात एक महिला सांगत आहे की जरांगे आंदोलन थंड करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्या महिलेला दुसरा व्यक्ती विचारतो की पैसे कुठून आले आणि कसे दिले. तेव्हा ती महिला काही आकडे आणि व्यवहारांबद्दल बोलते. हा संवाद एक हजार कोटी, दोन हजार कोटी असा कोणताही पुरावा नसलेला आहे. त्याला शेंडा ना बुंधा नाही असे कदम म्हणाले.

कोणीही कॉन्फरन्स कॉलवर बसून असे म्हणू शकते की याला हजार कोटी दिले, त्याला दोन हजार कोटी दिले. पण त्याचा पुरावा काय, असा सवाल त्यांनी केला. मात्र क्लिपमधील गोष्टी गंभीर असल्याने त्याची चौकशी झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी रामदास कदम यांनी केली आहे. ते म्हणाले की ही तीन वर्ष जुनी क्लिप असली तरी त्यातील महिला कोण आहे, तिच्याकडे 500 कोटी रुपये कुठून आले, तिने पैसे कुठे दिले, हे सगळे समोर आले पाहिजे.

एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी कायदेशीर अभ्यास कोणाच्या बंगल्यावर झाला हे विनोद पाटील यांना विचारून पहा, ते सांगतील. जर आमच्याच समाजाच्या नेत्याला अशा पद्धतीने काही मंडळी बदनाम करत असतील तर जरांगे यांनी शिंदे यांच्या बाजूने उभे राहायला हवे होते.

या प्रकरणी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. आजच मी एकनाथ शिंदे यांना भेटून यावर चर्चा करणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून या क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे. माझ्याकडेही ती 32 मिनिटांची क्लिप आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी त्यांनी सांगितले की या क्लिपमध्ये भाजपचा कोणताही मोठा नेता नाही. हे केवळ शिंदे यांना बदनाम करण्यासाठीचे षडयंत्र आहे का, हे चौकशीतूनच समोर येईल. जर हे षडयंत्र असेल तर संपूर्ण समाजाने एकत्र येऊन ते हाणून पाडले पाहिजे.