मुंबई : सध्या मुंबईमध्ये जैन समाजाकडून सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी पांढरे पट्टे मारले गेल्याच्या प्रकरणावरून वाद पेटला आहे. जैन समाजाच्या वतीने आपल्या धार्मिक भावना जपण्याच्या उद्देशाने पांढरे पट्टे सार्वजनिक जागांवर मारले जात होते. मात्र यावर सामान्यांनी आक्षेप घेतला. आता हा वाद थेट राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला आहे.
दरम्यान आज जैन समाजाच्या वतीने थेट राज ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेतली आहे. मात्र यावर राज ठाकरे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडत जैन समाजाला खडसावले आहे.
राज ठाकरे यांची आज घरी जैन समाजाने भेट घेतली. यावेळी सार्वजनिक ठिकाणी पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला असून यावर तोडगा काढण्यासाठी जैन समाज राज ठाकरे यांना भेटीसाठी गेले होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, " तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका. तुमची डोकी भडकवली जात आहेत. आमची डोकी भडकली तर केवढे होईल. तुमच्याकडे कोणी येत असेल तर कारपेट टाका. येऊन गेले की काढून टाका. तुम्ही पांढरे पट्टे मारत आहात. विनाकारण वाद निर्माण करत आहात. इतकी वर्ष लोक राहत आहे. इतके गुजराती लोक राहत आहेत. आत्ताच कसे सुरु झाले गेल्या दहा-बारा वर्षात..? तुम्हाला काय वाटते आहे वर दोन गुजराती बसले आहेत तर काहीही करू. कापड टाका पांढरे पट्टे कसले मारत आहात? समोरच्यांच्या गोष्टी समजून घ्या, व्यापारी लोक आहात व्यापार करा शांत जागा.. आजपर्यंत कोणी अडवले आहे का ? तुमच्या समाजातील लोकांना समजावून सांगा..!" अशा थेट शब्दात राज ठाकरे यांनी जैन समाजाला खडसावले आहे.
वाद पेटला आहे तो सार्वजनिक ठिकाणी पांढरे पट्टे मारल्यावरून.. जेव्हा जैन मुनि सोसायट्यांमध्ये जातात त्यावेळी अशा प्रकारचे हे पांढरे पट्टे मारले गेले आहेत. अशी मान्यता आहे की पावसाळ्यामध्ये रस्त्यावर जमिनीवर शैवाल किंवा इतर कीटकांचे प्रमाण वाढते. त्यावर पाय पडू नये अशी मान्यता जैन समाजाची आहे. त्यामुळे हे पांढरे पट्टे मारले गेले होते. परंतु मुंबईसारख्या ठिकाणी अनेक जाती, धर्म, समाज एकत्र राहतात. अशातच एका समाजाने अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी मारलेल्या या पांढऱ्या पट्ट्यांवरून सोसायटीतील इतर नागरिकांनी आक्षेप घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरू होता. या वादाने आता राजकीय स्वरूप घेतले असून राज ठाकरे यांनी आता मध्यस्थी करून जैन समाजाला कठोर शब्दात खडसावले आहे.