RAIN UPDATE : पुढील 5 दिवस मुंबईसह राज्यात पावसाचा जोर कायम; 27 ते 29 जुलैला घाट भागात ऑरेंज अलर्ट - टॉप न्यूज मराठी

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, वीज आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने 26 जुलै रविवारसाठी संपूर्ण राज्यात ग्रीन अलर्ट जाहीर केला आहे. याचा अर्थ कोणताही विशेष इशारा नसून हवामान सर्वसाधारण राहील.

मात्र 27 जुलै सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे. या दिवशी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येलो अलर्ट म्हणजे मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता. यात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, नागपूर, अमरावती सारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे.

28 जुलै मंगळवारीही हाच पॅटर्न कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग ते गडचिरोलीपर्यंत अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. जळगावसह पुणे घाट, नाशिक घाट आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना होऊ शकते.

29 जुलै बुधवारी कोकणातील रायगड आणि पुणे घाटासाठी ऑरेंज अलर्ट आहे. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट कायम राहील.

30 जुलै गुरुवारी मात्र हवामानात सुधारणा होण्याचा अंदाज आहे. नाशिक घाट, पुणे घाट आणि रायगड वगळता उर्वरित राज्यात ग्रीन अलर्ट आहे.

एकूणच 27 ते 29 जुलै या तीन दिवसात घाट भाग आणि विदर्भात मुसळधार पावसाचा धोका आहे. हवामान विभागाने नागरिकांना नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आणि वीज चमकताना झाडांखाली थांबू नये असे आवाहन केले आहे.

स्रोत : मुंबई हवामान विभाग, https://mausam.imd.gov.in/mumbai/mcdata/district.pdf