मुंबई : जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर एकीकडे जल संकट येते की काय अशी परिस्थिती असतानाच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली. शहरातील अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे.
अनेक दिवसांपासून सर्वच जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हवामान खात्याने एक जुलैपासून महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता केवळ सात टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले होते. आज सकाळपासून पावसाने चांगला जोर धरला आहे.
दरम्यान मुंबईमध्ये आज सकाळपासूनच सोसाट्याचा वारा देखील सुटलाय. या वाऱ्यामुळे समुद्रात देखील प्रचंड लाटा उसळत आहेत. खऱ्या अर्थाने आता मॉन्सून सुरू झाला आहे. जोरदार पाऊस आणि सोसाटच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झालं असलं तरीही मरीन ड्राइवर मात्र या धडकणार्या लाटा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील काही तास मुसळधार पाऊस कोसळणार आहे.