निवडणूक आयोग आणि भाजपवर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा न घेतल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका केली आहे. दिल्लीत आंदोलन रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यावरूनच राहुल गांधी म्हणाले की सरकार मोठी चूक करत आहे आणि आम्हाला तेच हवे आहे.
दिल्लीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून व्होट चोरीच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे. दिल्लीचे रुपांतर जेलमध्ये झाले आहे का असा सवाल राहुल गांधी यांनी केला. ट्रेन आणि बसेस रोखल्या जात आहेत. दिल्लीचा किल्ला बनवला गेला आहे. ठिकठिकाणी 20 ते 30 हजार पोलीस तैनात केले आहेत. आम्हाला हेच हवे आहे की पोलिसांनी रस्त्यावर यावे. सरकार हीच चूक करत आहे. आम्हाला देशाला हे दाखवायचे आहे की सरकार आणि नरेंद्र मोदी हे ज्ञानेश कुमार यांना वाचवत आहेत. आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. सरकार त्यांना जितके जास्त संरक्षण देईल तितके आम्ही त्यांच्या नियंत्रकांपर्यंत पोहोचू असे ते म्हणाले.
ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की त्यांना आता झोप लागत नाही. आम्हाला सगळीकडून माहिती मिळत आहे. तुमची काय अवस्था आहे हे आम्हाला माहिती आहे. घाबरू नका आम्ही तुम्हाला सोडणार नाही. लाखो लोक रस्त्यावर आहेत. तुम्हाला हटवण्यासाठीच आमचे आंदोलन आहे असे वक्तव्य त्यांनी केले.
यावेळी त्यांनी पोलिसांबाबतही मोठा दावा केला. पोलीस स्वतःच संभ्रमात आहेत. तरुणांना मारण्यास का सांगत आहात असा सवाल पोलीस करत आहेत. दुसरीकडे संघाच्या लोकांना मात्र मोकळे सोडले जात आहे. भाजपचे लोक महिलांना मारत आहेत आणि तरुणांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश दिले जात आहेत. यामुळे आम्हालाच फायदा होत आहे. पन्नास टक्के पोलीस सांगत आहेत की तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे असेही राहुल गांधी म्हणाले.
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी भेटण्यास नकार दिल्यामुळे आज आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत असे त्यांनी जाहीर केले. केंद्र सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात आहेत आणि ते आम्हाला सर्व माहिती देत आहेत असा दावाही त्यांनी यावेळी केला.