RAHUL GANDHI : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल; राहुल गांधींचा इशारा, इंडिया आघाडी जंतरमंतरवर धडकणार - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल असा आक्रमक पवित्रा राहुल गांधी यांनी घेतला आहे. आम्ही सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते जंतरमंतरवर जात आहोत, सर्वांनी जंतरमंतरला यावे असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. काल आम्हाला सांगितले गेले की तुम्ही या ठिकाणी आंदोलन करू शकत नाही, त्यामुळे आम्ही आता जंतरमंतरवर आंदोलनासाठी जात आहोत असे राहुल गांधी म्हणाले.

काय आहे संपूर्ण प्रकरण

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोग आणि इंडिया आघाडीमध्ये संघर्ष सुरू आहे. मतदार यादीतील घोळ आणि बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षण म्हणजेच SIR च्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर 6 ऑक्टोबर रोजी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवले आणि आकाशवाणी भवन परिसरात रोखून ठेवले.

काल रात्री उशिरापर्यंत दिल्लीत मोठ्या घडामोडी घडल्या. आकाशवाणी भवन परिसरात इंडिया आघाडीचे नेते सुमारे 8 ते 9 तास ठिय्या देऊन बसले होते. यामध्ये राहुल गांधी यांचाही समावेश होता. जोपर्यंत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर रात्री 9 वाजता पोलिसांनी सर्व नेत्यांना तीन बसमध्ये टाकून तेथून हलवले होते.

आज पुन्हा आंदोलन सुरू

काल रात्रीच्या कारवाईनंतर आज सकाळी पुन्हा एकदा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा उघडला आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील एका हॉटेलमध्ये विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व खासदार हजर होते. जेवणादरम्यान चर्चा झाली आणि पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय झाला. आता जवळपास तीन बस दाखल झाल्या असून या बसमधून सर्व खासदार जंतरमंतरवर जाणार आहेत आणि तिथे आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. माझ्यावर 100 गुन्हे दाखल झाले तरी काही समस्या नाही. हे सगळे गुन्हे माझ्यासाठी मेडल आहेत. आम्ही जंतरमंतरवर आंदोलन करू पण निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच. राहुल गांधी यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता आरपारची लढाई होणार असल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत ज्ञानेश कुमार

ज्ञानेश कुमार हे भारताचे 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1964 रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला आहे. ते 1988 च्या बॅचचे केरळ केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले आहे, त्यानंतर आयसीएफएआय मधून बिझनेस फायनान्स आणि हार्वर्ड विद्यापीठातून एनव्हायर्नमेंटल इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेतले आहे.

केंद्र सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. गृह मंत्रालयात असताना कलम 370 हटवणे आणि राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना यासारख्या महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यांची भूमिका होती. ते संरक्षण मंत्रालयात संयुक्त सचिव, गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव, संसदीय कार्य मंत्रालय आणि सहकार मंत्रालयात सचिव म्हणून काम केले आहे. 31 जानेवारी 2024 रोजी ते सहकार मंत्रालयातून निवृत्त झाले.

14 मार्च 2024 रोजी त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि 19 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी राजीव कुमार यांच्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. ते नवीन कायद्याअंतर्गत नियुक्त झालेले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत आहे. सध्या बिहार मतदार यादी पुनरिक्षण आणि मतदार यादीतील घोळाच्या मुद्द्यावरून विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.