Radhakrushna Vikhe Patil : "मी फक्त तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो...!" गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंची विखे पाटलांनी घेतली भेट ! काय झाली चर्चा ? - टॉप न्यूज मराठी

छत्रपती संभाजीनगर - मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची उपोषणानंतर प्रकृती खालावली असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री अचानक त्रास वाढल्याने मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यरात्री रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

पार्श्वभूमी काय ?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सलग 20 दिवसांचे आमरण उपोषण केले होते. सरकारने काही मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र उपोषणाच्या काळात अन्न पाणी न घेतल्याने शरीरात प्रचंड अशक्तपणा आला. त्यानंतर त्यांना थेट गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. चावरे हेच जरांगे पाटील यांच्यावर उपचार करत आहेत.

रुग्णालयात नेमके काय घडले

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री जरांगे पाटील यांना अचानक घाम येणे, क्रॅम्प येणे आणि अशक्तपणा जाणवू लागला. बाथरूमला गेल्यानंतर दरदरून घाम आल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावर लक्ष वाढवले. याची माहिती मिळताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तातडीने रुग्णालयात पोहोचले.

यावेळी जरांगे पाटील यांनी विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली की रात्रीचाच लय बेक्कार त्रास होतोय. दिवसभर बरे वाटते पण रात्री त्रास वाढतो.

यावर विखे पाटील यांनी त्यांना धीर देत सांगितले की, " तुम्ही काळजी घ्या, पाच सहा दिवसात बरे व्हाल. मी फक्त तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो आहे. सर्व काही ठरल्याप्रमाणे होणार आहे. समित्यांसाठी तुम्ही नावे पाठवा, आम्ही लगेच जीआर काढतो.

डॉक्टरांनी काय सांगितले

उपचार करणारे डॉ. चावरे यांनी विखे पाटील यांना माहिती दिली की 20 दिवस काहीही पोटात नसल्याने आणि झोप न झाल्याने त्रास होत आहे. त्यांना क्रॅम्प येत आहे. उठण्या बसण्याचा त्रास होत आहे. यावर विखे पाटील यांनी त्यांना ऑक्सिजन आणि एनर्जी वाढेल असे उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

विखे पाटील यांची माध्यमांना प्रतिक्रिया

रुग्णालयाबाहेर माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. गॅलेक्सी हॉस्पिटल त्यांच्यासाठी घरसारखेच आहे. डॉक्टर बारकाईने लक्ष देत आहेत. दोन चार दिवसात ते बरे होतील असा विश्वास आहे. तसेच आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, जिल्हा पातळीवर प्रमाणपत्र देण्यासाठी अडचणी येत होत्या. कागदपत्र मिळत नव्हती. त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर एसओपी तयार करून समित्या स्थापन करत आहोत. जरांगे पाटील यांनी नावे पाठवताच तातडीने जीआर काढला जाईल.

सध्या जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर असून पुढील दोन ते तीन दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे.