RADHA PATIL : नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात नृत्यांगनांच्या डान्सवरून वाद झाल्यानंतर नृत्यांगना राधा पाटील हिने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. " कंबर हलवणे म्हणजे अश्लीलता आहे का, लावणीमध्येही कंबर हलवली जाते, मग त्यावरून टीका का करता...?" असा सवाल तिने केला आहे. महिला डान्स करताना कंबर हलवणारच, हा डान्सचा एक भाग आहे असे तिने माध्यमांशी बोलताना म्हंटले आहे.
यंदा 2026 मध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुंबई, पुणे आणि सातारा येथील अनेक मोठ्या दहीहंडी मंडळांनी आकर्षणासाठी नृत्यांगनांना बोलावले होते. त्यावेळी स्टेजवर मराठी आणि हिंदी गाण्यांवर नृत्यांगनांनी डान्स केला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यावरून वाद सुरु झाला. धार्मिक सणामध्ये अशा प्रकारे नाचवणे कितपत योग्य आहे, हा धार्मिक सण आहे की अश्लील डान्सचा कार्यक्रम असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेत पोलिसात तक्रार देखील केली होती.
या सगळ्या वादावर राधा पाटील हिने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ती म्हणाली की " कोणताही मुद्दा घेऊन आम्हाला जज केले जाते, आम्ही किती सहन करायचे. आम्हालाही प्रॉब्लेम्स असतात पण आम्ही दाखवत नाही. लावणी आणि दहीहंडीत केलेल्या डान्समध्ये फरक आहे हे मला मान्य आहे पण आम्ही पूर्ण पाश्चात्य डान्स करत नाही. आम्ही लावणी आणि वेस्टर्न दोन्ही प्रकार करतो. अनेकांना वाटते अशा गाण्यांमुळे महाराष्ट्राचा बिहार झाला आहे पण माझ्या कार्यक्रमात एकही हिंदी गाणे नसते, सगळी गाणी मराठीच असतात. इतरांनी हिंदी गाण्यांवर डान्स केला की दिसत नाही पण मला एकच मुद्दा धरून टार्गेट केले जात आहे. आम्ही नृत्य सादर करताना साडी नेसतो, साडी नेसल्यावर ब्लाऊज आणि कंबर दिसणे ही साहजिक बाब आहे, त्यात अश्लीलता काय आहे. मी कधीही अश्लील हातवारे करून नृत्य केले नाही, केले असेल तर व्हिडीओ दाखवा असे आव्हान तिने दिले. तसेच तिने अप्रत्यक्षपणे गौतमी पाटीलवरही टीका केली. एका पाटीलने घाण केली म्हणजे दुसरीही पाटील घाण करेल का, पाटील आडनाव आहे म्हणून मला टार्गेट करताय का ?" असा सवाल तिने केला.
राधा पाटील ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध लोकनृत्यांगना आहे. लावणी आणि स्टेज शोच्या माध्यमातून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबई, पुणे, सातारा भागात तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. सोशल मीडियावरही तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. यापूर्वी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवरूनही अशाच प्रकारचा वाद झाला होता, त्यानंतर आता राधा पाटीलच्या दहीहंडीतील डान्सवरून नवा वाद निर्माण झाला आहे.