Pune Railway Megablock : पुणे रेल्वे स्टेशनवर रविवारी ९ तासांचा विशेष मेगाब्लॉक; लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम - टॉप न्यूज मराठी

पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे पुणे यार्ड (पुणे-दौंड विभाग) येथे रविवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नऊ तासांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ९ तासांच्या ब्लॉकमुळे पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या उपनगरीय (लोकल), एक्सप्रेस आणि DEMU सेवा विस्कळित होणार असून अनेक गाड्या रद्द किंवा शॉर्ट-टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

वाहतुकीवरील निर्बंध आणि परिणाम

या विशेष तांत्रिक ब्लॉकदरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १, पुणे यार्डकडे जाणारी 'अप' (UP) मुख्य मार्गिका तसेच मार्गिका क्रमांक १ ते ६ यांवरून गाड्यांची ये-जा पूर्णपणे बंद राहील. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या पायाभूत सुविधांच्या आणि सुरक्षेच्या कामांमुळे ७ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर ७ गाड्या शॉर्ट-टर्मिनेट (आधीच थांबवणे) आणि ४ गाड्या शॉर्ट-ओरिजिनेट (दुसऱ्या स्टेशनवरून सोडणे) केल्या जातील. यात प्रामुख्याने पुणे-लोणावळा लोकल, पुणे-तळेगाव लोकल आणि डेक्कन एक्स्प्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल झाले आहेत. काही एक्सप्रेस गाड्या पुण्याऐवजी हडपसर, शिवाजीनगर किंवा खडकी स्थानकावरून सोडल्या जातील.

२ ऑगस्ट रोजी खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत: 

  • - ९९९०२ पुणे-तळेगाव उपनगरीय (लोकल)
  • - ९९९०३ तळेगाव-पुणे उपनगरीय (लोकल)
  • - ९९८१८ पुणे-लोणावळा उपनगरीय (लोकल)
  • - ९९८१७ लोणावळा-शिवाजीनगर उपनगरीय (लोकल)
  • - ११०७ CSMT मुंबई-पुणे एक्सप्रेस
  • - ११०८ पुणे-CSMT मुंबई एक्सप्रेस
  • - ७१४०७ पुणे-दौंड DEMU

निर्धारित स्थानकाआधीच प्रवास संपणाऱ्या  गाड्या| (Short Terminate Trains)

  • - २९४० जयपूर-पुणे एक्सप्रेस (१ ऑगस्ट रोजी सुटणारी): खडकी येथे प्रवास संपेल.
  • - १२१३६ नागपूर-पुणे एक्सप्रेस (१ ऑगस्ट रोजी सुटणारी): हडपसर येथे प्रवास संपेल.
  • - ११४०६ अमरावती-पुणे एक्सप्रेस (१ ऑगस्ट रोजी सुटणारी): हडपसर येथे प्रवास संपेल.
  • - १२१२७ CSMT मुंबई-पुणे एक्सप्रेस (२ ऑगस्ट रोजी सुटणारी): खडकी येथे प्रवास संपेल.
  • - ११०७८ जम्मू तवी-पुणे एक्सप्रेस (३१ जुलै रोजी सुटणारी): हडपसर येथे प्रवास संपेल.
  • - ९९८१३ लोणावळा-पुणे उपनगरीय (२ ऑगस्ट रोजी सुटणारी): शिवाजीनगर येथे प्रवास संपेल.
  • - ७१४०६ बारामती-पुणे DEMU (२ ऑगस्ट रोजी सुटणारी): दौंड येथे प्रवास संपेल. 

पुणे स्थानकाऐवजी इतर स्थानकांवरून सुटणाऱ्या गाड्या (Short Originate)

  • ९९८२० पुणे-लोणावळा उपनगरीय सेवा (२ ऑगस्ट रोजी सुटणारी): ही गाडी शिवाजीनगर येथून सुटेल.
  • १२९३९ पुणे-जयपूर एक्सप्रेस (२ ऑगस्ट रोजी सुटणारी): ही गाडी खडकी येथून सायंकाळी ५:३५ वाजता सुटेल.
  • १२१३५ पुणे-नागपूर एक्सप्रेस (२ ऑगस्ट रोजी सुटणारी): ही गाडी हडपसर येथून सायंकाळी ५:४५ वाजता सुटेल.
  • १२१२८ पुणे-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस (२ ऑगस्ट रोजी सुटणारी): ही गाडी खडकी येथून सायंकाळी ५:५५ वाजता सुटेल.

रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन

या ब्लॉकच्या काळात इलेक्ट्रिक, सिग्नल, दूरसंचार आणि ओव्हरहेड वायरशी संबंधित अत्यंत महत्त्वाची कामे पूर्ण केली जाणार आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने आधीच हे नियोजन केले आहे. प्रवाशांनी घरून निघण्यापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासून घ्यावी. सुधारित वेळापत्रकाची अधिकृत माहिती घेण्यासाठी प्रवाशांनी National Train Enquiry System (NTES) App किंवा रेल्वेच्या अधिकृत चौकशी पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.