PUNE POLITICS : मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही...! अभिमन्यू पवारांच्या टोमण्याचा मेधा कुलकर्णींना राग अनावर, नेमकं काय म्हणाले पवार ? - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुण्यामध्ये आज नाराजी नाट्य रंगले आहे. घडलं असं की, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पुण्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णी यांना थेट जातीवरून टीकाटिप्पणी केल्याने त्यांनी थेट कार्यक्रमातूनच काढता पाय घेतला असल्याचे बोलले जाते आहे. 

 नेमकं काय घडलं 

मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. दरम्यान व्यासपीठावर मांडलेल्या खुर्च्यांवर कोणी मागे आणि कोणी पुढे बसायचं असा हा वाद सुरू झाला. यामध्ये अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णी यांना थेट मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असे म्हटले असल्याचे मेधाताई कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी संतापाच्या भरात कार्यक्रम स्थळावरून थेट काढता पाय घेतला आहे.

यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी चर्चेला उधाण आले. परंतु मी असं म्हणालोच नाही अशी स्पष्ट प्रतिक्रिया आमदार अभिमन्यू पवार यांनी दिले आहे. ते म्हणाले की, "ताईंचा गैरसमज झाला आहे. मी त्यांना एवढंच म्हणालो की नरेंद्र पाटील पुढे बसतील कारण ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण दोघे मागं बसू असं मी त्यांना म्हणालो... यात कुठलाही जातीचा विषय किंवा वाद नाही." असं अभिमन्यू पवार म्हणाले आहेत.

अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिले. पुढच्या रांगेमध्ये एकच खुर्ची होती. त्यामुळे आपण मागे बसू असं म्हटलं असल्याचा अभिमन्यू पवार म्हणाले आहेत. परंतु मेधा कुलकर्णी यांनी थेट कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात आता या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.