PUNE NEWS : तिरंग्याच्या मानसन्मान, अभिमान, स्वाभिमान कधीही झुकू देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - टॉप न्यूज मराठी

पुणे : 'विकसित भारताच्या निर्मितीसाठी तरुणांनी तिरंगा हाती घेतला असून, तिरंगा आमच्या मनात आणि जगण्यात आहे. या तिरंग्याच्या मानसन्मान, अभिमान आणि स्वाभिमानासाठी मैदानात उतरू आणि विकसित भारताचे आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करून आसमंतात तिरंगा फडकवू,' असा ठाम निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला. 'तिरंगा हाती घेतल्यानंतर राज्यघटनेतील अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचेही स्मरण ठेवा,' असे आवाहनही त्यांनी तरुणाईला केले. 

स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला मानवंदना देण्यासाठी तिरंगा गौरव समितीतर्फे पुण्यात आयोजित भव्य ‘तिरंगा यात्रे’त ते बोलत होते. शिवाजीनगर येथील पोलिस मैदानाजवळील ललित महल हॉटेल ते छत्रपती संभाजी महाराज उद्यानापर्यंत ही तिरंगा यात्रा अतिशय उत्साहात काढण्यात आली. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर (एफ.सी. रोड) तिरंग्याचा महापूर पाहायला मिळाला. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, शत्रुघ्न काटे यांच्यासह सर्व आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि पुणेकर युवा देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ते १५ ऑगस्ट या काळात राष्ट्रभक्ती प्रकट करण्यासाठी प्रत्येकाने हाती तिरंगा घेऊन रस्त्यावर येण्याचे आवाहन केले आहे. ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी ‘करो या मरो’चा नारा देत इंग्रजांना ‘भारत छोडो’ ठणकावून सांगितले होते, ज्या क्रांतीतून १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री आपला तिरंगा फडकला. ही आई जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यभूमी आहे. जोपर्यंत या भूमीत छत्रपतींचे मावळे आहेत, तोपर्यंत हा तिरंगा अभिमानाने फडकत राहील,' असे मुख्यमंत्री म्हणाले. 

तिरंगा हाती घेताना राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून त्या पूर्ण करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. विकसित भारताच्या स्वप्नासोबतच पुढील २० वर्षांत सर्वसमावेशक, प्रगतीशील आणि तरुणांच्या आकांक्षांना बळ देणारा 'विकसित महाराष्ट्र' घडवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. क्रांतिकारकांचे बलिदान आणि सीमांवर शत्रूंना धूळ चारणाऱ्या सैनिकांच्या पराक्रमाचे स्मरण करत त्यांनी पुण्याच्या युवा शक्तीचे कौतुक केले. 'पुणे ही विद्यानगरी आणि इनोव्हेशन नगरी आहे. या तरुणांच्या बळावरच उद्याचा बलशाली भारत उभा राहील,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोदींच्या नेतृत्वात भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असल्याचे सांगत, 'अभी भारत ने नापी है मुठ्ठीभर जमीन, अभी खुला आसमान बाकी है...' या ओळींच्या माध्यमातून संपूर्ण आसमंतात तिरंगा फडकवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.