पुणे : पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता. दोन दिवसांपासून पुन्हा वातावरण कोरडे असले तरीही पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा मात्र मोठ्या प्रमाणावर अशुद्ध होतो आहे.
पुण्यातील सहकारनगर-पद्मावती भागामध्ये पाण्याचा अत्यंत गढूळ आणि अशुद्ध पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. पावसाळ्याचे दिवस असताना त्यात वातावरण सातत्याने बदलत असताना साथीचे रोग पसरू शकतात. अशातच पाणी देखील अशुद्ध आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
लवकरात लवकर हा पाणीपुरवठा स्वच्छ आणि सुरळीत करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन नागरिकांच्या वतीने भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय हिंगे यांनी स्वारगेट पाणीपुरवठा विभागाला दिले आहे. तरीही नागरिकांनी तूर्तास पाणी उकळून प्यावे, वापरायचे पाणी आवश्यक असल्यास तुरटी टाकून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.