पुणे : पुणेकरांची प्रतीक्षा संपली असून, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी या मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण झाले असून, ४ नोव्हेंबरपासून सकाळी सहा वाजता नियमित प्रवासी सेवा सुरू होईल. जिल्हा न्यायालय ते हिंजवडी फेज तीन (मेगापोलिस सर्कल) या प्रवासासाठी प्रवाशांना ६२ रुपये तिकीटदर आकारला जाणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त अभिजित चौधरी यांनी मेट्रोच्या उद्घाटनासंदर्भात माहिती दिली. पहिल्या टप्प्यात १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जाणार असून, उर्वरित सहा स्थानके जानेवारी २०२७ पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. या मार्गावर मेट्रोचे २२ ट्रेन संच उपलब्ध आहेत.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावर गर्दीच्या वेळेत सकाळी ७.३० ते ९.३० आणि सायंकाळी ४ ते ७ या कालावधीत दर सहा मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल. इतर वेळेत दर १२ मिनिटांनी मेट्रो धावेल. सकाळी सहा वाजता सेवा सुरू होणार असून, रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी जिल्हा न्यायालय स्थानकातून हिंजवडीच्या दिशेने शेवटची मेट्रो सुटेल.