पुणे - पुणेकरांसाठी दिवाळीपूर्वीच मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रोच्या माण हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका 3 चे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पुणे मेट्रो टप्पा 2 चे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. या मार्गामुळे पुण्याच्या वाहतुकीला नवी गती मिळणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे पुण्यातील मोठ्या आयटी क्षेत्राला अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पुणे हे आयटी, ऑटोमोबाईल, फार्मा आणि स्टार्टअप क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र आहे. मेट्रोमुळे शहराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल.
देशात 2014 मध्ये केवळ 248 किलोमीटरचे मेट्रो मार्ग कार्यरत होते. आज हे जाळे सुमारे 1200 किलोमीटरपर्यंत विस्तारले असून 26 शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू आहे. महाराष्ट्रात 2014 मध्ये केवळ 10 किलोमीटर मेट्रो मार्ग होता. आज सुमारे 200 किलोमीटर मेट्रो मार्ग सेवेत असून 680 किलोमीटरहून अधिक मार्गांची कामे सुरू असल्याचे मोदी म्हणाले.
2030 पर्यंत पुणे देशाचे महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआर परिसरात मेट्रो, इलेक्ट्रिक बस, रिंगरोड आणि नव्या विमानतळासह आधुनिक वाहतूक सुविधांचे जाळे उभारण्यात येत आहे. 2030 पर्यंत पुणे देशातील महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल. हिंजवडी परिसरात दररोज हजारो कर्मचारी कामासाठी येतात. वाहतूक कोंडीमुळे त्यांना एक ते दोन तास अडकावे लागते. मेट्रोमुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रकल्पाची वैशिष्ट्ये
पुणे मेट्रो मार्गिका 3 ही माण हिंजवडी ते शिवाजीनगर अशी 23.203 किलोमीटर लांबीची मार्गिका असून या मार्गावर एकूण 23 उन्नत स्थानके आहेत. या प्रकल्पासाठी 8 हजार 313 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही देशातील पहिली 100 टक्के महिला संचालित पिंक मेट्रो असणार आहे. या मार्गावर 90 महिला चालक मेट्रो चालवणार आहेत.
पुणे मेट्रो टप्पा 2 मध्ये खडकवासला ते खराडी, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि मानिकबाग ते नळस्टॉप हे 46 किलोमीटरचे नवे मार्ग असणार आहेत. या विस्तारामुळे पुणे मेट्रोचे जाळे 100 किलोमीटरपेक्षा अधिक होणार आहे.