पुणे: पुण्यातील गणेशोत्सवाने यंदा बाजारपेठेचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले असून विविध क्षेत्रांनी घेतलेली गरुडझेप खरोखरच कौतुकास्पद आहे. गणेशोत्सव आणि गौराईच्या आगमनाने पुणे शहरातील बाजारपेठेत यंदा सुमारे २ हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक उलाढाल झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या उलाढालीत तब्बल २०० ते ३०० कोटी रुपयांची मोठी वाढ झाली असून, मंदीचे सावट दूर सारत बाप्पाने पुण्याच्या अर्थव्यवस्थेला 'बुस्टर डोस' दिला आहे.
घरगुती खरेदीपासून ते सार्वजनिक मंडळांच्या भव्य आयोजनापर्यंत प्रत्येक क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा मूर्ती, मखर, सजावट आणि पूजासाहित्याचा असून त्यातून ४५० ते ५०० कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्याखालोखाल मंडप, देखावे आणि भव्य विद्युतरोषणाईने बाजारपेठेत ४०० ते ४५० कोटी रुपयांची भर घातली आहे. उत्सव काळात पुणेकरांनी खाद्यसंस्कृतीचा आणि प्रसादाचा मनमुराद आस्वाद घेतल्याने मोदक, मिठाई, फराळ व प्रसाद तसेच हॉटेल आणि खाद्यविक्री या दोन्ही क्षेत्रांनी प्रत्येकी २०० ते २२५ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
बाप्पाला सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करण्याच्या परंपरेमुळे सराफा आणि भेटवस्तूंचा बाजार १७५ ते २०० कोटींनी चमकला. याशिवाय, धार्मिक विधी आणि पूजेसाठी लागणारी फळे व नारळ (१२५ ते १५० कोटी), विसर्जन मिरवणुकीची शान असलेले ढोल-ताशा पथके, डीजे व वाहतूक (१२५ ते १५० कोटी) आणि फुले, हार व दूर्वा (१०० ते १२५ कोटी) यांनीही बाजारपेठेला मोठी गती दिली. या सर्व मुख्य आणि छोट्या क्षेत्रांची मिळून यंदा पुण्यात तब्बल १,७७५ ते २,०२५ कोटी रुपयांचे भव्य अर्थचक्र फिरले असून बाप्पाने व्यापारी आणि छोट्या विक्रेत्यांना सुवर्णकाळ दाखवला आहे.
रात्रीच्या वेळी गणेश दर्शनासाठी उसळलेल्या गर्दीमुळे फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी चालक आणि विक्रेत्यांची मोठी कमाई झाली, ज्यातून प्रत्येकाला रोजगार व हातभार मिळाला. सार्वजनिक मंडळांनी विद्युत रोषणाई आणि भव्य देखाव्यांवर केलेल्या खर्चामुळे मंडप व सजावट क्षेत्रास मोठे आर्थिक बळ मिळाले. सोन्या-चांदीचे मुकुट, हार व विविध अलंकार अर्पण करण्याच्या प्रवृत्तीमुळे दागिने व चांदीच्या विक्रीला चालना मिळाली.