Pune Firing News: पुणे हादरले! शिवाजीनगर कोर्टाच्या गेटसमोर भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने वार; घटनास्थळी सापडल्या बंदुका, नेमकं काय घडलं? - टॉप न्यूज मराठी

पुण्यातील गजबजलेल्या शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर आज (बुधवार, ता. २५) भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. न्यायालयासमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी असताना हा थरार घडल्याने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दुचाकींवरून आलेल्या सुमारे सहा ते सात हल्लेखोरांनी हा हल्ला चढवला. हल्लेखोरांच्या हातात बंदुका आणि कोयते अशी घातक शस्त्रे होती. न्यायालयाच्या कामकाजासाठी आलेल्या एका व्यक्तीवर या टोळक्याने अचानक गोळीबार करत कोयत्याने वार केले. हा प्रकार इतका अचानक घडला आणि हल्लेखोरांकडे शस्त्रे असल्याने, मोठी गर्दी असूनही कोणीही मदतीसाठी पुढे धजावले नाही. हल्ला केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेनंतर घटनास्थळी दोन बंदुका आणि काही जिवंत काडतुसे (गोळ्या) पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी अवघ्या काही क्षणातच घटनास्थळी धाव घेतली. तसेच फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबार आणि कोयता गँगच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आता थेट न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच अशा प्रकारे गोळीबार झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. "हल्ला करणारे आरोपी सध्या अज्ञात असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. सखोल तपासानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेत घटनास्थळावरून एक पिस्तुल आणि काडतुसांनी भरलेली मॅगझीन पोलिसांनी जप्त केली आहे. हल्ल्यानंतर जखमी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तिला पोलिसांनी तातडीने एका रिक्षातून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र, या जखमी व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. 

वकिलांच्या माहितीनुसार, हल्लेखोर एकूण सहा जण होते. सुरुवातीला एका आरोपीने बंदूक काढली, तर इतर साथीदारांनी कोयते बाहेर काढले आणि त्यानंतर गोळीबार करण्यात आला. आवाज ऐकून वकील इमारतीच्या खिडकीजवळ आले, तेव्हा सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पळ काढताना दिसले.