PUNE : "मराठा क्रांती मोर्चाची पुणे पोलिसांकडे तक्रार ! नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्यावर FIR ची मागणी, पुण्यात प्रवेशबंदीचा इशारा" - टॉप न्यूज मराठी

पुणे : मराठा समाजातील महिला आणि मुलींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पुण्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. मराठा क्रांती मोर्चा पुणेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. वाघमारे यांनी नवी पेठेतील पत्रकार संघात केलेल्या वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते, असा आरोप करत मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना लेखी निवेदन दिले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, रेखा कोंडे, अश्विनी खाडे, धनंजय जाधव, अनिल ताडगे, सचिन आडेकर, बाळासाहेब आमराळे, तुषार काकडे, प्रशांत कुंजीर, आबा जगताप, अमर पवार, राकेश गायकवाड, अनिकेत भगत, अतिश शेडगे आणि निता चव्हाण या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नवनाथ वाघमारे यांनी माध्यमांसमोर बोलताना मराठा समाजातील महिला आणि मुलींविषयी अत्यंत खालच्या पातळीचे, चारित्र्यावर शंका घेणारे आणि अवमानकारक विधान केले आहे.

तक्रारीनुसार वाघमारे यांनी "मराठा समाजातील महिला ओबीसी समाजातील मुलांच्या मागे पैसे पाहून जातात" अशा स्वरूपाचे वक्तव्य केले. हे विधान केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून संपूर्ण मराठा समाजातील महिलांच्या प्रतिष्ठेवर आघात करणारे आहे. शिवाय त्यांनी "मराठा" आणि "ओबीसी" या दोन मोठ्या सामाजिक समूहांचा थेट उल्लेख केला असल्याने त्यातून समाजात वैमनस्य, द्वेष आणि सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोणत्या कलमांखाली कारवाईची मागणी ?

मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या निवेदनात भारतीय न्याय संहिता 2023 मधील अनेक कलमांचा आधार घेण्यात आला आहे. त्यात कलम 196 म्हणजे वेगवेगळ्या गटांमध्ये द्वेष आणि वैमनस्य पसरवणे, कलम 352 म्हणजे शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे, कलम 353 म्हणजे सार्वजनिक गैरसमज आणि अशांतता निर्माण करणारी विधाने करणे आणि कलम 356 म्हणजे बदनामी करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

तसेच महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या वक्तव्यासाठी कलम 79 अंतर्गतही तपास करण्याची मागणी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या Sandeep Kudale प्रकरणाचा दाखला देताना मोर्चाने म्हटले आहे की, सार्वजनिक व्यक्तींच्या वक्तव्यामुळे समाजावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये भाषणस्वातंत्र्याच्या नावाखाली सूट देता येणार नाही.

मराठा क्रांती मोर्चाने पोलिसांकडे केवळ FIR ची मागणीच केली नाही तर आणखी एक महत्त्वाची मागणीही केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, जर पुणे शहरात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही तर नवनाथ वाघमारे यांना पुणे शहरात बंदी घालण्यात येईल. मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना वक्तव्याचा मूळ व्हिडिओ, ऑडिओ, सोशल मीडिया पोस्ट, स्क्रीनशॉट आणि इतर डिजिटल पुरावे तातडीने सुरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे. हे वक्तव्य किती लोकांपर्यंत पोहोचले, त्यामागील हेतू काय होता आणि त्यामुळे समाजात काय प्रतिक्रिया उमटल्या याची सखोल चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी बोलताना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही समाजातील महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा ओलांडून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी या तक्रारीला केवळ साधी तक्रार न मानता दखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करून निष्पक्ष आणि वेळेत तपास करावा, अशी मागणी मोर्चाने केली आहे. कारवाईबाबत लेखी माहिती देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

सध्या या तक्रारीनंतर पुणे पोलीस या प्रकरणी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.