PUNE FESTIVAL 2026 : चंद्रकांतदादा पाटील यांनी सपत्नीक केली पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची आरती, 38 व्या फेस्टिव्हलला उत्साहात सुरुवात - टॉप न्यूज मराठी

पुणे : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे फेस्टिव्हल अॅडवाइजरी कमिटीचे चेअरमन चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सपत्नीक पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची आरती केली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. अंजली चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होत्या.

हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम येथे प्रतिष्ठापना झालेल्या पुणे फेस्टिव्हलच्या बाप्पाचे दर्शन घेऊन त्यांनी श्रद्धापूर्वक आरती केली आणि पुणे फेस्टिव्हलच्या यशासाठी प्रार्थना केली. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, जनरल सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई आणि फेस्टिव्हलचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2026 पुणे फेस्टिव्हलची रूपरेषा काय आहे ?

यंदा 38 व्या पुणे फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे फेस्टिव्हल हा केवळ एक उत्सव नसून पुण्याची सांस्कृतिक ओळख आहे. 1989 साली सुरू झालेल्या या फेस्टिव्हलने पुण्याला जागतिक नकाशावर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख मिळवून दिली.

यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये पारंपारिक आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळणार आहे. येत्या काही दिवसात शास्त्रीय संगीत, नृत्य, मराठी-हिंदी चित्रपट कलाकारांचे कार्यक्रम, युवा महोत्सव, महिला मेळावे, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात पुणेकरांसाठी हा फेस्टिव्हल एक मोठी पर्वणी असणार आहे. यंदा विशेषतः पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि येरवडा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या मूर्तीला प्रोत्साहन देण्यात आले आहे.

पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून पुण्याचा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न दरवर्षी केला जातो आणि यंदाही तोच वारसा पुढे नेला जाणार आहे.