पुण्यात औषध कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन म्हणजे FDA ने पुण्यातील वाडकी येथील प्रसिद्ध औषध कंपनी सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेसच्या गोदामाचा औषध विक्री आणि वितरण परवाना रद्द केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या गोदामात नियमांचे उल्लंघन होत होते. Reactin Plus Tablets या औषधाच्या पॅकेजिंग, साठवणूक आणि कागदपत्रांमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्या होत्या. तसेच Schedule H या प्रिस्क्रिप्शन औषधावर अनधिकृत दावे लिहिले होते. 27 ऑगस्टला FDA ने पहिल्यांदा कारवाई केली होती.
कंपनीने बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने FDA ला पुन्हा प्रक्रिया करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार FDA ने 4 सप्टेंबरला कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. कंपनीने 11 सप्टेंबरला लेखी उत्तर दिले आणि 21 सप्टेंबरला सुनावणी झाली. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर FDA चे सहाय्यक आयुक्त पुणे विभाग 3 यांनी 1 ऑक्टोबरला हा परवाना रद्द करण्याचा अंतिम आदेश काढला आणि तो आज 3 ऑक्टोबरला जाहीर झाला.
या गोदामातून संपूर्ण महाराष्ट्रात औषधांचा पुरवठा होत होता. परवाना रद्द झाल्याने आता कंपनीला या गोदामातून औषध विक्री किंवा वितरण करता येणार नाही. यामुळे औषध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या कारवाईनंतर पुण्यातील इतर औषध विक्रेत्यांमध्ये आणि कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. FDA ने यापुढे अशा तपासण्या वाढवणार असल्याचे सांगितले आहे.