पुणे : Snapchat वर प्रिन्सिका जोशी नावाने ओळख, मग मुलीच्या आवाजात बोलून नग्न व्हिडिओ कॉल आणि नंतर दीड लाखांची खंडणी. अशा सायबर भामट्याला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे एका तरुणाने तक्रार दिली होती. Snapchat वर त्याची प्रिन्सिका जोशी नावाच्या अकाउंटशी ओळख झाली. काही दिवस चॅटिंग झाल्यावर समोरून अश्लील व्हिडिओ कॉल आला. या कॉलमध्ये तरुणाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेण्यात आला.
त्यानंतर हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी सुरू झाली. घाबरलेल्या तरुणाने 1468 USDT म्हणजे सुमारे दीड लाख रुपये Crypto Wallet मध्ये पाठवले. पैसे मिळूनही आरोपीने ब्लॅकमेल सुरूच ठेवले. शेवटी तरुणाने सायबर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. प्रिन्सिका जोशी नावाने बोलणारी व्यक्ती प्रत्यक्षात मुलगी नसून मुलगा आहे. तोच मुलीच्या आवाजात बोलून लोकांना फसवत होता. त्याने Snapchat, Instagram वर बनावट अकाउंट बनवले होते.
पोलिसांनी Crypto Transaction चा माग काढून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे अनोळखी मुलीच्या नावाने आलेल्या व्हिडिओ कॉलपासून सावध रहा, कोणी ब्लॅकमेल करत असेल तर तात्काळ 1930 वर कॉल करा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.