PUNE CRIME NEWS : घरफोडी करून मुंबईला पळालेला सराईत गुन्हेगार पुणे गुन्हे शाखेच्या जाळ्यात - टॉप न्यूज मराठी

पुणे - भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 ने मुंबईतून जेरबंद केले आहे.

भारती विद्यापीठ येथे गु.र.नं. 324/2025 अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. पोलीस अंमलदार रवींद्र लोखंडे व प्रदिप राठोड यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 4 इसम सिल्वर वॅगनर गाडीतून येऊन घरफोडी करत असल्याचे दिसले.

पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे व अजित शिंदे यांनी तांत्रिक विश्लेषण केले असता हा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केल्याचे व ते मुंबईत असल्याचे समोर आले. त्यानंतर पथक मुंबईला रवाना झाले.

पथकाने 8 सप्टेंबर रोजी फकरुद्दीन इमामहुसैन शाह वय 34 राहणार घाटकोपर मुंबई याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली. त्याने रायगड, सिंधुदुर्ग आणि नाशिकमध्येही घरफोडी केल्याचे सांगितले.