पुणे पोलिसांवर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या दोन सराईत आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-5 ने छत्रपती संभाजीनगर येथून जेरबंद केले आहे. तब्बल दोन वर्षांपासून हे दोघे पोलिसांना गुंगारा देत होते.
हा प्रकार 29 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री घडला होता. पुण्यात बिट मार्शल म्हणून कर्तव्य बजावत असताना पोलीस अंमलदार विट मार्शल यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते. त्यावेळी बिट मार्शल यांनी स्वतःच्या बचावासाठी दोन राऊंड फायर केले होते. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.
घटनेपासून दोन्ही आरोपी फरार होते. ते कधी डोंगराळ भागात तर कधी जंगलात लपून राहत होते. गुन्हे शाखा त्यांचा सतत शोध घेत होती.
अखेर 22 ऑगस्ट 2026 रोजी गुन्हे शाखा युनिट-5 ला गोपनीय माहिती मिळाली की, हे दोन्ही आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे आले आहेत. मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपींची नावे
1) शाहरुख कबीर खान पठाण, वय 28 वर्षे आणि
2) फारुख कबीर खान पठाण, वय 26 वर्षे, दोघे रा. जांजाळा, ता. अजिंठा, जि. छत्रपती संभाजीनगर अशी आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पवार आणि त्यांच्या पथकाने केली आहे.