पुणे: मध्यरात्री रस्त्यावर बुलेट गाड्यांच्या फटाका सायलेन्सरने दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांवर विश्रांतवाडी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. 31 जुलै 2026 च्या रात्री 2 ते 2:30 च्या सुमारास वाघोलीतील सोलस्टिसी सोसायटी परिसरात हा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी 4 तरुणांवर गुन्हा दाखल करत 4 बुलेट गाड्या जप्त केल्या आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 4,14,000 रुपये आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी काही तरुण आपल्या बुलेट गाड्यांना 'फटाका सायलेन्सर' लावून सोसायटीच्या परिसरात भरधाव वेगाने गाड्या चालवत होते. यामुळे मोठा आवाज होऊन परिसरातील नागरिकांच्या झोपमोड होत होती. नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे:
1. आशिष अशोक शिंदे, वय 29, रा. निळोकरनगर, लोणावळा
2. गुरुप्रसाद कर्नसिंग कंविस, वय 29, रा. निळोकरनगर, लोणावळा
3. संजय मुन्सरत सुरवसे, वय 20, रा. बिमनगर, भिमनगर, वाघोली
4. गौरव लक्ष्मण मरगळे, वय 20, रा. मस्केवस्ती, विश्रांतवाडी
- 4 बुलेट मोटरसायकल- अंदाजे 4 लाख रुपये
- 2 फटाका सायलेन्सर - प्रत्येकी 7,000 रुपये
- 9 स्प्लेंडर गाडीचे सायलेन्सर
आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 281, 292 आणि मोटार वाहन कायदा कलम 184, 181(1), 199(5), 198, 197 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिसर-4 श्री. हितेश राजनिकर, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग सुनील जैतपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक संतोष राजपूत, अमर कदम यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.
रात्रीच्या वेळी फटाका सायलेन्सर लावून नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारे कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा विश्रांतवाडी पोलिसांनी दिला आहे.