PUNE CRIME : पुणे सिंहगड पोलिसांची मोठी कारवाई; रेकॉर्डवरील गुंडाकडून 3 पिस्तूल जप्त, दोघे जेरबंद - टॉप न्यूज मराठी

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या सिंहगड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुंडांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली असून दोन आरोपींना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

19 ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष मांडवकर आणि त्यांचे पथक सिंहगड परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, ओमकार पांढरे आणि सुरज गायकवाड हे दोघे सराईत गुन्हेगार बेकायदेशीर पिस्तूल घेऊन फिरत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी बनावटीची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आणखी एक पिस्तूल विकल्याची कबुली दिली. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तिसरे पिस्तूल देखील जप्त केले. तिन्ही पिस्तूलांची किंमत सुमारे 90 हजार रुपये आहे. आरोपींविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी करत आहेत. 

ही संपूर्ण कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे.