पुणे - कोथरूड परिसरात बांधकाम साईटवरून कॉपर वायर चोरणाऱ्या दोन आंतरराज्यीय चोरट्यांना कोथरूड पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला 7 लाख 7 हजार 360 रुपयांचा कॉपर वायरचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी फिर्यादी श्रीकांत सिंधू यादव, वय 36 वर्ष, व्यवसाय इलेक्ट्रिशियन, रा. निकम चाळ लेन 7 कर्वेनगर पुणे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. उजवी भुसारी कॉलनी कोथरूड येथील नवीन बांधकामाच्या साईटवरून बिल्डिंग मधील फ्लॅट फोडून 7,07,360 रुपयांची कॉपर वायर चोरीस गेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 422 / 2026 भारतीय न्याय संहिता कलम 305 (5), 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, पोलीस हवालदार योगेश सुकट, गौतम पवार, विशाल मंडले, अजय पवार, प्रदीप जवसे, सुरज कदम, उमेश राऊत असे कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्ह्यांचे अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस चौकी अंमलदार योगेश सुकट यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल घेऊन विक्री करण्याकरीता दोन संशयित इसम हे डुस्कर खिंड सर्व्हिस रोड कोथरूड पुणे येथे येणार आहेत.
त्या माहितीची खात्री करून पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची नावे 1) अहमद रजा इसरार अहमद खान, रा. गाव हेरिया चंद्रांसी ता. तुलशीपूर जि. बलरामपूर उत्तर प्रदेश 2) फैज्याज मेराज शहा रा. गाव सिशानिया घोपलापूर, राम नगर ता. तुलशीपूर जि. बलरामपूर उत्तर प्रदेश अशी आहेत.
त्यांच्याकडे एका पांढऱ्या रंगाच्या गोणी मध्ये कॉपर वायर मिळून आल्या. अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर कॉपर वायर ही कोथरूड उजवी भुसारी कॉलनी येथील नवीन बांधकाम चालू असलेल्या ठिकाणाहून चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्यांना कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 422/2026 मध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली 7,07,360 रुपयांची कॉपर वायर हस्तगत करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.