पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने परीक्षा काळात सुरु असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' या विशेष मोहिमे अंतर्गत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत 24 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू आणि तंबाखूयुक्त पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2 लाख 79 हजार 400 रुपये इतकी आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे. प्राथमिक चौकशीत सदर प्रतिबंधित माल बेकायदेशीरपणे साठवून विक्री केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मोरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. नितीन ठाकूर व त्यांच्या टीमने केली. या पथकात पोलीस कॉन्स्टेबल सुशिल बेंद्रे, निलेश के-हाली, गणेश दाभाडे, अमोल सराग, यांचा समावेश होता.
पुणे शहरात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी 'मिशन क्रॅकडाऊन' अधिक तीव्र केले असून नागरिकांनी अशा अवैध विक्रीबाबत माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त अविनाश कुमार यांनी केले आहे.