पुणे: शहरात गेल्या काही दिवसांपासून खळबळ माजवणाऱ्या खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील 2 पाहिजे आरोपी आणि 2 विधिसंघर्षित बालकांना अखेर पुणे गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने जेरबंद केले आहे. सिंहगड रोडवरील हिंगणे चौक आणि पद्मावती परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पर्वती पोलीस ठाण्यात गुरनं 251/2026 नुसार खुनाचा गुन्हा दाखल होता. भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 115(2), 189(2), 191(2), 190 नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी फरार असल्याने गुन्हे शाखा युनिट 2 तपास करत होती.
दिनांक 03 ऑगस्ट 2026 रोजी युनिट 2 च्या पोलीस अंमलदारांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी हिंगणे चौक, सिंहगड आणि पद्मावती भागात दिसत आहेत. ही माहिती मिळताच युनिट 2 चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तातडीने पथकाला हालचाली करण्याचे आदेश दिले.
पोउपनि ज्ञानेश्वर दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, शिवानंद कायगुडे, महेश मंडलिक, संदीप शिर्के यांच्या टीमने हिंगणे चौकात सापळा लावला. त्यावेळी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत ते गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची नावे सुजित सोमनाथ धुतावळे वय 19 वर्षे रा. समर्थनगर हिंगणे खुर्द आणि आशिष राजू सोनवणे वय 19 वर्षे रा. समर्थनगर हिंगणे खुर्द सिंहगड रोड अशी आहेत.
त्याचवेळी दुसऱ्या पथकाने पद्मावती परिसरातून या गुन्ह्यातील दोन विधिसंघर्षित बालकांना देखील ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चौघांनाही पर्वती पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त गुन्हे गौहर हसन आणि सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून सिंहगड रोड परिसरात गुन्हेगारीच्या घटना वाढत होत्या. त्यामुळे ही कारवाई नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. पुढील तपास पर्वती पोलीस करत आहेत.