PUNE CRIME : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट 2 च्या ताब्यात - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात 2 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पथकाने जेरबंद केले आहे.

दिनांक 19/08/2026 रोजी युनिट 2 चे पोलीस अंमलदार महेश मंडलिक, कुंदन शिंदे आणि सचिन शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. 202/2026 भा.द.वि. कलम 109(1), 118(1), 191(2), 191(3), 191(4), 3(5) आणि शस्त्र अधिनियम 4,25 प्रमाणे दाखल गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी अविनाश जाधव हा मुळचा लातूर जिल्ह्यातील असून सध्या गुजरातनगर, आंबिल ओढा जळक, सासवड तालुक्यात राहत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला. यावेळी आरोपी अविनाश उर्फ जाबीर वय 23 वर्षे रा. साने गुजरातनगर आंबिल ओढा जळक सासवड तालुका पुणे याला ताब्यात घेण्यात आले.

सदर गुन्हा हा दि. 19/04/2026 रोजी घडला होता. आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वीच्या वादातून आरोपीने धारदार शस्त्राचा वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याच्या अटकेसाठी न्यायालयाने अटक वॉरंट देखील बजावले होते. सदर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहकारनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त श्रीमती तेजस्वी सातपुते, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त विक्रम मिरजकर, पोलीस उपायुक्त राजेंद्र मुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिवार, पोलीस निरीक्षक अविनाश माने आणि युनिट 2 च्या पथकाने केली आहे.