PUNE CRIME : 2 कोटी तयार ठेवा ! पुण्यातील व्यापाऱ्याला बिष्णोई गॅंगकडून थेट धमकीचा कॉल; पुण्यामध्ये एकाच आठवड्यात तिसरी घटना - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुण्यामध्ये बिश्नोई गॅंगची Bishnoi Gang दहशत पसरते आहे. बिष्णोई गॅंग कडून पुण्यातील एका व्यापाऱ्याला थोडी थोडकी नाही तर तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात पुण्यामध्ये तिसऱ्यांदा बिष्णोई गॅंग कडून खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी पुण्यातील व्यापारी यांना धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्याने त्याची ओळख शुभम लोणकर अशी सांगितली. दरम्यान त्यांचा बांधकाम व्यवसाय, कारचा नोंदणी क्रमांक, त्याच बरोबर दैनंदिन हालचालींची माहिती असून कुटुंबातील सदस्यांची देखील माहिती असल्याचा त्याने सांगितलं. त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि दोन कोटी तयार ठेवा अशी धमकी त्यांनी दिली. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्याने उत्तम नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. 

दरम्यान मागच्या आठवड्यात वानवडी परिसरातील एका स्टील उद्योगपतीकडे 50 कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. तर 23 जून रोजी वडकी येथील औषध घाऊक विक्रेत्याकडे दोन कोटीची खंडणीची मागणी करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे या व्यापाऱ्यांना कॉल केल्यानंतर मानकरवाडी येथील संबंधित उद्योगपतीच्या कारखान्यावर गोळीबार देखील करण्यात आला होता. त्यामुळे एकंदरीतच पुण्यामध्ये आता बिश्नोई गॅंग आपली दहशत वाढवण्याचा प्रयत्न करते आहे.