PUNE CRIME : फुरसुंगीत प्रेमसंबंधाच्या संशयातून 17 वर्षीय मुलाचा निर्घृण खून, 2 आरोपींचे आत्मसमर्पण - टॉप न्यूज मराठी

पुणे : फुरसुंगी परिसरातील संकेत विहार येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून 17 वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवार 25 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी दोन मित्रांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एक अल्पवयीन आहे.

फिर्यादी अजय हरीश राइकवार राहणार कोंढवा बुद्रुक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा 17 वर्षीय मुलगा तनिष्क अजय राइकवार राहणार हेवन पार्क काळेपडळ हा शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लेन नंबर 17, कचरा डेपोच्या मागे संकेत विहार फुरसुंगी येथे मृतावस्थेत आढळला. त्याच्या डोक्यात दगडाने वार करून खून करण्यात आला होता.

या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा क्र. 327/2026 BNS 103(1), 3(5) सह 4(25) भा.ह.का. सह 37(1), 135 म.पो.का. प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपासात मयताचा खून त्याच्या दोन मित्रांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींमध्ये रोहित संदीप खाडे वय 20 राहणार पानसरे नगर येवलेवाडी आणि विजय आवळे वय 17 राहणार संकेत विहार गल्ली नंबर 7 फुरसुंगी यांचा समावेश आहे. दोघांनीही वानवडी पोलीस स्टेशन येथे हजर होऊन आत्मसमर्पण केले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहितला अटक करण्यात आली असून अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तनिष्कचे आरोपी रोहित याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याने मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून रागाच्या भरात आरोपींनी मिळून तनिष्कच्या डोक्यात दगड आणि धारदार शस्त्राने वार करून खून केला. या घटनेमुळे फुरसुंगी परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. भूषण पोटवडे करत आहेत.