पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि आसपासच्या परिसरात वाढलेल्या ट्रान्सफॉर्मर डीपी चोरीच्या घटनांमुळे गुन्हे शाखा युनिट 7 चे अंमलदार गस्त घालत असताना पोलीस अंमलदार विनायक साळवे यांना बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की वाडेगाव ता. हवेली जि. पुणे येथे काही ट्रान्सफॉर्मर चोरी करणारे इसम येणार आहेत.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार वाडेगाव येथे सापळा रचून एका संशयित मालवाहू टेम्पो क्र. एमएच 12 जीटी 6675 सह तिघांना ताब्यात घेण्यात आले.
अटक केलेल्या आरोपींची नावे मोहम्मद साहेबजान मंगरेखान वय 30 वर्षे रा. गोटेमाळ सासवड ता. पुरंदर जि. पुणे, आदर्श चंद्रप्रकाश पांडे वय 22 वर्षे रा. सदर आणि चंद्रसेन शिवरतन धारीया वय 28 वर्षे रा. सदर अशी आहेत. तिघेही मूळ उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी आहेत.
चौकशी दरम्यान त्यांनी गेल्या 5 ते 6 महिन्यात लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाडेगाव, आष्टापूर, सांगवी सांडस, न्हावी सांडस आणि हिंगणगाव येथून एकूण 8 डीपी ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली.
याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 324(4) व भारतीय विद्युत अधिनियम कलम 136 अन्वये एकूण 8 गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून अंदाजे 12 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त गौहर हसन, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.