PUNE CRIME : भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; गावठी पिस्तूल-जिवंत काडतूसासह 1 जणाला अटक, 51 हजारांचा मुद्देमाल जप्त - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुणे शहर पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत गावठी शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला जेरबंद केले आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने मित्रानगर परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी यांच्या पथकाला 29 जुलै रोजी बाणेर-वाघोली रस्त्यावरील गंगार्दनजवळ एक इसम संशयास्पदरित्या उभा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला आणि विशाल प्रद्याद कलबंडे, वय 26 वर्षे, रा. ज्ञानेश्वरी हाइट्स, भिलारेवाडी, ता. हवेली याला ताब्यात घेतले. झडतीमध्ये आरोपीकडून 1 गावठी बनावटीचे पिस्तूल किंमत ₹50,000 आणि 1 जिवंत काडतूस किंमत ₹1,000 असा एकूण ₹51,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 313/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर आर्म्स अॅक्ट कलम 3 सह 25 आणि भा.द.वि. कलम 30(1),(3) सह 135 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि निलेश मोकाशी करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसींग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांना सपोनि शैलेश संख्याळे आणि अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांच्या पथकाने सहकार्य केले.

शहरात शस्त्र बाळगून गुन्हे करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.