पुणे : पुण्यात भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन गावठी बनावटीचे पिस्तुल आणि चार जिवंत काडतुस जप्त केली आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोंढवा आणि कात्रज परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
पहिली कारवाई २६ ऑगस्ट रोजी करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव, पोलीस अंमलदार नितेश चोरमले, सागर बोरसे, अभिमन्यू चौधरी हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना साई सिद्धी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठ दरम्यानच्या श्रीकृष्ण कॉलनीजवळ संशयित गल्ल्यांमध्ये फिरत असल्याचे दिसले. त्यांना थांबवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस मिळून आले. त्याची किंमत ५५ हजार रुपये आहे. त्यांना ताब्यात घेऊन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४४९/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई २७ ऑगस्टच्या मध्यरात्री करण्यात आली. पोलीस अंमलदार सागर बोरसे, नितेश चोरमले, अभिमन्यू चौधरी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कात्रज डेअरी चौक ते सरहद चौक दरम्यानचे कात्रज डेअरी ते निंबाळकर वस्ती दरम्यान एक इसम अनधिकृतपणे गावठी पिस्तुल बाळगत आहे. त्याप्रमाणे नऱ्हे परिसरात जाऊन बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेत असताना इसम नाव शिरीष जितेंद्र खोपडे, वय २५ वर्षे, रा. श्री गणेश निवास, जगदंब वसाहती, समोर, आंबेगाव पठार, पुणे हा त्याचे ताब्यात २ गावठी बनावटीचे पिस्तुल व २ जिवंत काडतुसासह मिळून आल्याने त्याचेकडून ते जप्त करून त्याचेविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४५५/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ २ चे निलेश मोरे, सहायक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवी जाधव, पोलीस अंमलदार सागर बोरसे, नितेश चोरमले, अभिमन्यू चौधरी, सचिन सरपाले, मंगेश वाघ, निलेश ढमढेरे, सोहम शेडकर, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मल्हारीकांत कोळी, कृष्णा खरसे यांनी केली आहे.