PUNE CRIME : सिंहगड रोड पोलिसांची कारवाई, रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुस जप्त - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलिसांनी एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले आहे. दि. 30/07/2026 रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि त्यांचा स्टाफ सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार विनायक मोहिते आणि सागर शेडगे यांना खात्रीलायक बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी "दादया घोलप" याच्याकडे गावठी पिस्टल आहे.

बातमीनुसार तो इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरील नवीन डीपी रोड, कल्पतरू ब्लॉसम सोसायटीच्या लेबर कॅम्पजवळ, सनसिटी रोड येथे थांबला होता. त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळी ट्रॅकपॅन्ट घातली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता वर्णनाप्रमाणेच इसम मिळून आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 40,000/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल आणि 1000/- रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस आढळून आले.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव यश उर्फ दादया कमलाकर घोलप, वय 18 वर्षे, रा. आझाद मित्र मंडळ जवळ, चरवडवस्ती, वडगाव बु. पुणे व गावडे बिल्डिंग, दिघे टॉवर समोर, जाधवनगर, वडगाव बु. पुणे असे सांगितले. त्याच्यावर सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे आर्म्स अॅक्ट कलम 3(25) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 135 अन्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर करत आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त श्री. विजय कुंभार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.