पुणे : वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने जलद कारवाई करत घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या 1 तासात जेरबंद केले आहे.
नेमके काय घडले?
दि. 23/07/2026 रोजी दत्त दिगंबर कॉलनी, वारजे जकात नाका येथे फिर्यादींचा घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. चोरट्याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांचे एकूण 3,15,100/- रुपये किमतीचे 2 लॅपटॉप, 1 मोबाईल फोन, 1 टॅब आणि 1 हेडफोन चोरून नेले. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 278/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या तपास पथकाने घटनास्थळाच्या आजूबाजूचे CCTV फुटेज तपासले आणि गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेतली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर 1 तासाच्या आत निळे वाडळ चौक, रामनगर, वारजे येथून आरोपी मंजुनाथ चाल्या डी.बी, वय 23 वर्षे, रा. कर्नाटक याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला.
आरोपीकडून चोरीतील 40,000/- रुपये किमतीचा 1 लॅपटॉप आणि 1 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे. इतर मुद्देमाल त्याच्या साथीदाराकडे असल्याचे त्याने सांगितले असून त्याचा शोध सुरू आहे.
दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी PG मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, रूम उघडी ठेवू नये. सकाळी लवकर जायचे असल्यास लॅच लॉक किंवा इतर पर्यायाचा वापर करावा. PG हॉस्टेल मालकांनीही आवश्यक ती काळजी घ्यावी. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.