पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी लग्न केलं होतं. असा खळबळ जनक दावा आता पोलिसांनी केला आहे. केतन या युवकाच्या हत्येनंतर पोलिसांनी अनेक बाजू, घटना, तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदार कसून तपासले आहेत. यामध्ये आता तांत्रिक तपासांमध्ये चेतन आणि सीया या दोघांनी यापूर्वीच लग्न केलं होतं असा दावा करण्यात आला आहे.
केतन अग्रवाल या युवकाच्या हत्येनंतर अनेक घटना घडल्या. प्रत्येक तपास मोहिमेमध्ये नवीन धक्कादायक माहिती समोर येते आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच गुढ होत चालले आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चेतन आणि सिया या दोघांचे व्हाट्सअप चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीच्या तपासातून या दोघांनी लपून छापून लग्न केल्याचा दावा केला जातो आहे.
धक्कादायक म्हणजे सिया आणि केतन यांचा साखरपुडा 19 फेब्रुवारी रोजी झाला होता.याच दरम्यान या दोघांनी लग्न केलं असल्याचं म्हटलं जात आहे.
वेब सिरीज आणि चित्रपटांमधून गुन्हा कसा करता येईल याचा केला होता अभ्यास
या घटनेनंतर आणखीन एक भयानक वास्तव समोर येत आहे. सिया आणि चेतन या दोघांनी केतनला संपवण्यापूर्वी अनेक व्हिडिओ, वेब सिरीज, चित्रपट पाहून अभ्यास करून त्यानंतर कट रचल्याचे देखील समोर येते आहे. नेमकं कसं मारलं गेलं तर संशय येणार नाही असा अभ्यास देखील या दोघांनी केला होता. हत्यार किंवा इतर पुरावे मिळू नयेत, स्वतःच्या मोबाईल ऐवजी नोकर वर्गाचा मोबाईल सोबत घेऊन येणे हा देखील याच प्लॅनचा भाग होता.
सिया आणि चेतन हे दोघे सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. दोन्हीही संशयित आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान आता या दोघांचं लग्न खरंच झालं होतं का? याची माहिती दोघांच्या घरच्यांपैकी कोणाला होती का ? याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.