पुणे : ‘आस्था फॉर विमेन’ संस्थेतर्फे खडकी शिक्षण संस्थेतील किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी विशेष प्रशिक्षण पार पडले. सुमारे ७०० विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. ‘जीवन कौशल्ये व किशोरी सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित हे प्रशिक्षण शिबिर दोन सत्रांत घेण्यात आले. जीएमआय कन्याशाळा, सी. के. गोयल कॉलेज, टी. जे. ज्युनियर कॉलेज व चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनींनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास, निर्णयक्षमता, भावनिक जाणीव, स्वतःची सुरक्षितता, लैंगिक शोषणाविरोधातील जागरूकता, स्वतःच्या हक्कांची जाणीव आणि भविष्यातील नेतृत्व अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर संवाद साधण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर कार्याध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
‘आस्था फॉर विमेन’ संस्थेच्या अध्यक्षा सिमिंतीनी शिंगाडे यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची गरज अधोरेखित केली. प्रशिक्षणादरम्यान ‘पर्सनल इज पोलिटिकल’ या विचाराचीही मुलींना ओळख करून देण्यात आली. आपल्या आयुष्यातील प्रश्न केवळ वैयक्तिक नसून, त्यामागे सामाजिक वास्तव आणि व्यवस्था असते, याची जाणीव करून देत मुलींनी स्वतःच्या आयुष्याबाबत जागरूक, स्वावलंबी आणि आपल्या ध्येयासाठी ठाम असले पाहिजे, असा संदेश देण्यात आला.
‘स्वतःच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी, सुरक्षिततेसाठी, स्वप्नांसाठी आणि प्रगतीसाठी स्वतःला प्राधान्य द्या. आपल्या भविष्याची दिशा स्वतः ठरवा आणि उद्याच्या सक्षम नेतृत्वासाठी आजपासून पाऊल टाका,’ हा मंत्र गायकवाड यांनी दिला.