महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानपरिषद पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026 साठी आज 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघाच्या 160 आणि शिक्षक मतदारसंघाच्या 72 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू झाले आहे.
पुणे विभागात एकूण दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील मतदार मतदान करणार आहेत. या मतदारसंघात एकूण 3 लाख 88 हजारांहून अधिक पदवीधर मतदार आहेत आणि 47 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपच्या डॉ स्मिता योगेश जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हर्षदा जाधव देशमुख आणि शिवसेना ठाकरे गटाचे सुनील मोदी हे प्रमुख उमेदवार आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघात एकूण 30 उमेदवार आहेत. भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर, शिवसेना शिंदे गटाचे सचिन सानप आणि अपक्ष दत्तात्रय सावंत यांच्यात प्रमुख लढत मानली जात आहे.
पुणे विभागात दोन्ही मतदारसंघ मिळून 4 लाख 49 हजार मतदार आहेत. संपूर्ण विभागात 1051 मतदान केंद्रे उभारली आहेत. प्रशासनाने सर्व केंद्रांवर पोलिस बंदोबस्त आणि मतदान साहित्याची व्यवस्था केली आहे. सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान चालणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.