PUNE : होळकर कर्जमुक्ती योजनेत पुण्यात 43 हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण , किती शेतकरी पात्र ? वाचा सविस्तर - टॉप न्यूज मराठी

पुणे : राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. काल अखेरपर्यंत जिल्ह्यातील 43 हजार 371 शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिली.

जगताप म्हणाले की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे. प्रमाणीकरण झाल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. त्याचबरोबर प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच पुढे नवीन पीक कर्जासाठी पात्रता मिळणार आहे. त्यामुळे अद्याप ज्यांनी प्रमाणीकरण केलेले नाही त्यांनी तातडीने ते करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

किती शेतकरी पात्र ?  

या योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 1 लाख 8 हजार 30 आणि विविध वाणिज्य बँकांची 17 हजार 756 अशी एकूण 1 लाख 22 हजार 786 कर्ज खाती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. 

सखोल पडताळणीनंतर पहिल्या टप्प्यात 64 हजार 664 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांची यादी बँकांना देण्यात आली असून, आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने रक्कम थेट खात्यात जमा केली जाईल.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आधार प्रमाणीकरण न केल्यास शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, बँका किंवा सीएससी केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी.