पुणे - चाकण औद्योगिक क्षेत्रातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिक्रमणे हटवून पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला आमदार बाबाजी काळे यांच्यासह पीएमआरडीए, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, महापालिका आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
काय निर्देश दिले -
1. नदी, नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांवरील अतिक्रमणे - औद्योगिक क्षेत्रातील नदी, नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांवरील अतिक्रमणांची माहिती संबंधित यंत्रणांनी सादर करावी. जलसंपदा विभाग आणि तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीने पावसाळी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन करावे. अतिक्रमणांवर कायदेशीर कारवाई करून ती 31 डिसेंबरपर्यंत हटवावी. तसेच महत्त्वाच्या नाले आणि पावसाच्या पाण्याच्या प्रवाह मार्गाचा तांत्रिक आढावा घेऊन 15 दिवसांत उपाययोजना निश्चित करावी.
2. रस्ते आणि वाहतूक - पुणे-नाशिक महामार्गावरील रुंदीकरण आणि यू-टर्न जंक्शनच्या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांनी समन्वयाने काम करावे. तळेगाव फेज-5 ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 जोडरस्त्याचे काम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी सोमवारपासून मनुष्यबळ वाढवावे. या कामासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी. वाहतूक व्यवस्थापनासाठी एमएसएफचे सुरक्षा रक्षकही पोलिसांना सहकार्य करतील.
3. सार्वजनिक वाहतूक - औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या प्रवासाच्या गरजा जाणून घेण्यासाठी ओरिजिन-डेस्टिनेशन सर्वेक्षण करावे. त्यानुसार एमआयडीसी, औद्योगिक संघटना आणि पीएमपीएमएल यांनी सार्वजनिक बससेवेचे नियोजन करावे. कारखान्यांच्या प्रमुखांसमवेत बैठक घेऊन सार्वजनिक सुविधा, सीएसआरमधील कामे, सुशोभीकरण आणि अनधिकृत पार्किंगच्या समस्यांवर उपाय करावेत.
4. पाणीपुरवठा आणि प्रदूषण - रस्ते आणि पावसाळी गटारांच्या कामांचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे. जलजीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठ्याबाबत कार्यवाही करावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पुढील बैठकांना उपस्थित राहून प्रदूषण नियंत्रणाबाबतचा अहवाल सादर करावा असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.