Pune : पदवीधर आणि शिक्षक मतदारांना 23 ऑक्टोबरला मतदानासाठी विशेष सुट्टी जाहीर - टॉप न्यूज मराठी

 पुणे :  भारत निवडणूक आयोगाने पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयान्वये या निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी म्हणजे शुक्रवार 23 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे.

निवडणुकीतील मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील कलम 135ब नुसार भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही रजा त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. ही रजा केवळ त्या मतदार संघाचे मतदार असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असल्याने सर्व शासकीय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहील याची काळजी कार्यालय प्रमुखांनी घ्यावी.

ही विशेष नैमित्तिक रजा खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना लागू होणार नाही. शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे या निवडणुकीकरिता खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर, शिक्षक मतदारांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्यात यावी, असे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली-उगले यांनी कळविले आहे.