PUNE : डेंगळे पुलाखाली पाण्यात अडकलेल्या 22 वर्षीय युवकाची अग्निशमन दलाकडून थरारक सुटका - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुण्यातील डेंगळे पुलाखाली आज दुपारी एका 22 वर्षीय युवकाची पाण्याने भरलेल्या चेंबरमध्ये अडकल्याने खळबळ उडाली. पाण्याचा प्रवाह वाढत असताना अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत अवघ्या 15 ते 20 मिनिटांत त्याला सुखरूप बाहेर काढले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांच्या लक्षात आले की युवक पुलाच्या मध्यभागी पाण्यातील चेंबरवर उभा आहे आणि आजूबाजूला पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत आहे. क्षणाचाही विलंब न करता जवानांनी बचावकार्य सुरू केले.रश्शी, शिडी आणि लाईफ जॅकेट च्या मदतीने एक जवान पाण्यात उतरला.वाढत्या पाण्याची पर्वा न करता जवानाने थेट चेंबरपर्यंत मजल मारली.त्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांत युवकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने युवकाला कोणतीही दुखापत झालेली नाही.

सुटका करण्यात आलेला युवक 22 वर्षांचा आहे. तो नेमका चेंबरमध्ये कसा पोहोचला याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने समाधानकारक माहिती दिलेली नाही. त्यामुळे पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही धाडसी कामगिरी कसबा अग्निशमन केंद्राचे वाहन चालक समीर शेख यांच्यासह जवान समित दळवी, गणेश लोणारे, राजेंद्र महाडीक, प्रसाद नाणेकर, संतोष अरगडे, प्रतिक कुंभार आणि आतिश नाईकनवरे यांनी पार पाडली. पावसाळ्यात नद्या, नाले आणि पुलांखालील भागात पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो. त्यामुळे नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.यावेळी जीवरक्षक राजू काची यांनी ही मदत केली.