पुणे: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी आज, दि. ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ९० लाख ८० हजार १७३ मतदारांची नोंद होती. या कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार ६२ लाख १३ हजार ६९२ इतके मतदार नोंदणी झाली आहे. यामध्ये ३१ लाख ५१ हजार २९७ पुरुष तर ३० लाख ६२ हजार १२ महिला व ३८३ तृतीयपंथी मतदार नोंदणी झाली आहे.
मतदान केंद्रांमध्ये ७ ने वाढ होऊन आता ८ हजार ४२४ मतदान केंद्र झाली आहेत. यामध्ये जुन्नर ३५६ आंबेगाव ३४४ खेड आळंदी ३९३ शिरूर ४५९ दौंड ३१५ इंदापूर ३३९ बारामती ३८८ पुरंदर ४१३ भोर ५६७ मावळ ४०२ चिंचवड ५६० पिंपरी ३९७ भोसरी ४९१ वडगाव शेरी ४३८ शिवाजीनगर २६६ कोथरूड ३८७ खडकवासला ५०२ पर्वती ३४४ हडपसर ५२५ पुणे कॅन्टोन्मेंट २७० कसबा पेठ २६८ असे एकूण ८ हजार ४२४ मतदान केंद्रांचा समावेश आहे. एएसडीडी यादीनुसार २८ लाख ६६ हजार ४८१ गणना अर्ज अनकलेक्टटेबल मतदार आहेत. त्यातील एक लाख ४३ हजार ९७५ दुबार, ३ लाख १२ हजार ४८ मयत, १७ लाख ८३ हजार ५८ अनुपस्थित, ५ लाख ९१ हजार ३८ स्थलांतरित व ३६ हजार ३६२ इतर मतदार आहेत.
प्रारूप मतदार यादीतील ६२ लाख ११ हजार ९५० मतदारांपैकी ५ लाख ७७ हजार ८२१ विसंगती तर ७ लाख ५४ हजार ५९७ मॅपिंग न झालेले अशा एकूण १३ लाख ३२ हजार ४१८ सुनावण्या होतील. या यादीमध्ये नाव नसल्यास प्रपत्र क्रमांक ६ भरुन नव्याने मतदार नोंदणी करावी. तसेच यादी नावामध्ये आक्षेप असल्यास प्रपत्र क्रमांक ७ भरुन आक्षेप नोंदविता येणार आहे. ईपीक कार्ड करिता प्रपत्र क्रमांक ८ भरता येईल आणि मतदार यादीमध्ये दुरुस्ती देखील करुन घेता येईल.
प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट मतदारांच्या तपशिलात तफावत आढळल्यास तसेच २००२ च्या मतदार यादीशी ज्यांचे मॅपिंग झालेले नाही (No Linkage), अशा मतदारांसाठी संबंधित यादी भागाच्या सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या स्तरावर सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीनंतर संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करायचे किंवा नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी दि. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती सादर करता येतील. दावे व हरकतींवर दि. ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कार्यवाही करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.gov.in संकेतस्थळावर ही यादी पाहता येणार आहे. याशिवाय, प्रारूप मतदार यादी भारत निवडणूक आयोगाच्या ECINET आणि Voter Service Portal वरही उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.