पुणे : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित लोकसंवाद-2026 उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभारी समाजसेवक गितांजली शिवचरण आणि समूह संघटिका अपर्णा प्रशांत मोरे यांनी नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळ आणि हनुमान मित्र मंडळ प्रतिष्ठान येथे नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी सांगितले की, महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य, उच्च शिक्षणासाठी मदत, महिला सक्षमीकरण, दिव्यांगांसाठी अर्थसहाय्य, कौशल्य विकास आणि व्यावसायिक अभ्यासक्रम, चारचाकी वाहन प्रशिक्षण तसेच बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधी दिल्या जातात. पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा.
महिलांनी बचत गट स्थापन करून सहभागी व्हावे, बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना, प्रशिक्षण आणि व्यवसायाच्या संधी मिळतात. दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि युडीआयडी कार्डासाठी समाज विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.
तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा मंच येथे रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी या मेळाव्यात सहभागी होऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा.
यावेळी संयुक्त प्रसाद मित्र मंडळाचे अध्यक्ष अजित परांजपे, कार्याध्यक्ष कुणाल आहेर, उपाध्यक्ष निखिल हजारे, हनुमान मित्र मंडळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल सुतार, खजिनदार किरण शिंदे, आतिक सय्यद यांच्यासह नागरिक उपस्थित होते.