Pune : सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या मागणीला यश, अतिक्रमण कारवाईत दुकानांचे नामफलक काढू नयेत, महापालिकेचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश - टॉप न्यूज मराठी

पुणे: पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान दुकानांचे अधिकृत नामफलक काढू नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. फुटपाथ, रस्ता आणि फ्रंट मार्जिन, साईड मार्जिनमधील अनधिकृत अतिक्रमणांवरच कारवाई करावी, असे आदेश परवाना आणि आकाशचिन्ह विभागाने काढले आहेत.

शहरात मोठ्या प्रमाणावर संयुक्त अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान काही ठिकाणी प्रत्यक्ष अतिक्रमण हटवण्याऐवजी दुकानांचे नामफलक काढले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी होती. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी हा मुद्दा महापालिका आयुक्तांकडे मांडला होता. दुकानदारांचे नामफलक काढू नयेत, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने हे निर्देश दिले आहेत.

आता कारवाई करताना दुकानांच्या भिंतीवरील नामफलक काढता येणार नाहीत. फक्त दुकानांच्या फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनमध्ये असलेले अनधिकृत अतिक्रमण हटवावे, असे आदेशात म्हटले आहे. हे निर्देश सर्व सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण निरीक्षक, आकाशचिन्ह निरीक्षक आणि कारवाई पथकातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मात्र फुटपाथवरील किंवा फुटपाथलगत असलेले अनधिकृत साईनबोर्ड आणि इतर अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई सुरूच राहणार आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, असेही महापालिकेने सांगितले आहे. या निर्णयामुळे अतिक्रमण कारवाईदरम्यान दुकानदारांना दिलासा मिळणार आहे.