पुणे : ‘राज्यातील शाळांची स्थिती बदलायची असेल तर शिक्षकांनी बदलांना सामोरे जायला हवे. शिक्षकाने स्वत: स्वयंशिस्त पाळली, वेळ पाळली, तरच विद्यार्थी पाळतील आणि आपण त्यांना एक सशक्त नागरिक म्हणून घडवू शकू. प्रत्येक शिक्षकाने वेळेआधी शाळेत हजर असायला हवे,’ असे मत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केले.
खडकी शिक्षण संस्थेत आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड वेतन श्रेणी, तसेच कला-क्रीडा शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण शिबिरांना शनिवारी भेटी देऊन सिंह यांनी शिक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक मंगेश जोशी, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक मच्छिंद्रनाथ कदम, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (DIET) प्राचार्य शेंडकर, खडकी संस्थेचे सचिव आनंद छाजेड, सहसचिव डॉ. संजय चाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमकुमार इंदोरे, प्राचार्य उद्धव घाडगे, उपप्राचार्य शरदचंद्र बोटेकर, मुख्याध्यापिका सुनंदा चपटे, मुख्याध्यापिका चंद्रकांता सोनकांबळे, पर्यवेक्षक प्रवीण मुरकुटे, नवनाथ जाधव आदी उपस्थित होते. संस्थेतर्फे सिंह, जोशी व आवटे यांचा सन्मान करण्यात आला.
राज्याच्या शिक्षण विभागातर्फे 13 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड वेतन श्रेणी, तसेच कला-क्रीडा शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण सुरू आहे. त्या अंतर्गत पुणे विभागातील तीन जिल्ह्यांतील शिक्षकांचे प्रशिक्षण खडकी येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांना भेटी देताना सिंह यांनी शिक्षकांशी विविध विषयांवर संवाद साधला.